शेतकऱ्यांच्या रक्ताने लिहिलेले निवेदन पोलिसांनी फाडले म्हणून त्या विरोधात व शेतकऱ्यांच्या काही मागण्यांसाठी,जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी काही शेतकऱ्यांसोबत आजपासून सावरगाव डुकरे येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.त्यांच्या या क्रियेला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा,चिखली यांनी सावरगाव या गावातच ‘प्रतिआन्दोलन’ सुरु करून चिखलीसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष सावरगाव या गावाकडे वळवले आहे.

आपल्या निवेदनामध्ये भाजपा युवा मोर्च्याचे चिखली तालुकाध्यक्ष संतोष काळे म्हणाले की,जिल्हा बँकेचे 94 कोटी रुपये थकवुन शेतकऱ्यांना देशोधडीला लावून, सावकाराच्या दारात उभे करणाऱ्या, तसेच अन्नदात्या बळीराजासाठी अन्नत्यागाची नौटंकी करणारे काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांच्या विरोधात आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत, पवन डुकरे, संतोष काळे व अमोल डुकरे पाटील हे सावरगाव डुकरे येथेच आजपासून “प्रती अन्नत्याग” आंदोलन करणार आहेत.त्यांनी त्यांच्या मागण्या खालील प्रमाणे सांगितल्या आहेत.
1)राहुल बोंद्रे यांनी जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे 94 कोटी रुपयांची थकीत कर्ज त्वरित भरावे
2) राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीमध्ये राहुल बोंद्रे अध्यक्ष असलेल्या अनुराधा अर्बन को-ऑपरेटिव बँकेने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी होऊन दोषींना कठोर शिक्षा व्हावी.
3) रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्था व मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणीच्या स्थापनेसाठी भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांवरील अन्याया दूर करावा.

राहुल बोंद्रे यांनी आपल्या कर्तुत्वाने शेतकऱ्यावर खरा अन्याय केला आहे.आपण केलेल्या गौड बंगालाची पोल खोल होऊ नये म्हणून राहुल बोंद्रे शेतकऱ्यांचा आसरा घेऊन , काही भोळ्या शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारला लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे.परंतु राहुल बोंद्रे यांचा हा खोटारडेपणा आम्ही उघड केल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळेच त्यांच्या खोट्या अन्नत्याग आंदोलनाला उत्तर म्हणून आम्ही अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.आमच्या आंदोलनातून अन्याय झालेल्या शेतकरी बांधवांना, शेतकऱ्यांची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला पूनर्जीवन मिळत असेल, तर प्रसंगी कोणत्याही टोकाला जाण्याची आमची तयारी आहे.असेही संतोष काळे म्हणाले.



