दिव्या खाली अंधार; चिखलीत काँग्रेसच्या हाती भोपळा, सपकाळ , बोंद्रे निष्प्रभ…?
राहुल गांधींच्या वर्तुळातील नेते म्हणून ओळख असलेले हर्षवर्धन सपकाळ यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची माळ अनपेक्षितपणे मिळाली. जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि एकदा आमदारकीचा अनुभव असलेल्या सपकाळ यांच्याकडून जोरात तळाला लागलेल्या काँग्रेसला नवी दिशा मिळेल, अशी वार्तांकणे त्यांच्या नियुक्तीच्या वेळी केली गेली. मात्र प्रत्यक्ष राजकारणात ही अपेक्षा किती पोकळ ठरली, हे नगरपरिषद निवडणुकांनी दाखवून दिले.
प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अवघ्या काही महिन्यात महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल लागले. बुलढाणा हा स्वतःचा जिल्हा आणि वास्तव्याचे शहर असूनही सपकाळ यांना बुलढाणा नगरपरिषदेत काँग्रेसचे ३० पैकी केवळ २ नगरसेवक निवडून आणता आले. विशेष म्हणजे हे दोन्ही नगरसेवक निवडून येताच आमदार संजय गायकवाड यांच्या शिवसेनेत दाखल झाले.
प्रदेशाध्यक्ष असूनही स्वतःच्या घरच्या मैदानावर छाप न पाडता आल्याने ‘दिव्या खाली अंधार’ ही म्हण पुन्हा एकदा राजकारणात खरी ठरल्याची चर्चा सुरू झाली.
बुलढाण्यानंतर चिखलीतही काँग्रेस नेतृत्वाने ताकद लावली. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे आणि प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी नगराध्यक्षपद व नगरसेवक निवडून आणण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले. निकालात काँग्रेसचे १२ नगरसेवक निवडून आले आणि कार्यकर्त्यांनी थोडा दिलासा घेतला. मात्र हा दिलासा फार काळ टिकणारा नव्हता.
निवडणूक निकालानंतर लगेचच या बाराही नगरसेवकांनी गटनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीनल गावंडे यांची नियुक्ती केली. एवढ्यावरच न थांबता राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार निलेश गावंडे यांना स्वीकृत नगरसेवक करून, काँग्रेसचे बाराही नगरसेवक थेट महायुतीच्या अविभाज्य घटक पक्षाच्या दावणीला बांधून देण्यात आले. निवडणूक काँग्रेसची, पदे मात्र दुसऱ्याची—अशी विचित्र स्थिती चिखलीत निर्माण झाली.
काँग्रेसच्या कोणत्याही नगरसेवकाला गटनेतेपद किंवा स्वीकृत नगरसेवक पद मिळू नये, याची सूक्ष्म पण प्रभावी काळजी घेतली गेल्याचे बोलले जाते. त्यासाठी काँग्रेस नेतृत्वाकडून आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचे आरोपही कानी पडत आहेत. परिणामी संख्याबळ असूनही काँग्रेसच्या नगरसेवक यांच्या हाती प्रत्यक्ष सत्तेच्या बाबतीत भोपळाच लागला.
एकीकडे प्रदेशाध्यक्ष सपकाळ स्वतःच्या जिल्ह्यात आणि शहरात प्रभाव दाखवू शकले नाहीत, तर दुसरीकडे चिखलीत जिल्हाध्यक्ष बोंद्रे यांची सारी मेहनत निष्फळ ठरली. आणि या सगळ्या गोंधळात काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले खरे, पण सत्ता, पदे आणि निर्णय सर्व काही विक्रीस काढून विधानसभेत दिलेल्या पैशांची काही प्रमाणात रिकवरी करण्यात आल्याची चर्चाही रंगलेली आहे.
एकूणच काय, प्रदेशाध्यक्षांच्या काळात काँग्रेसच्या हाती सत्ता आली नाही, उलट भोपळाच आला आणि ‘दिव्या खाली अंधार’ ही म्हण पुन्हा एकदा काँग्रेसच्या राजकारणावर शिक्कामोर्तब करून गेली, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात ठळकपणे ऐकू येत आहे….



