“पवारांच्या पाडळी” त जलजीवन मिशन मध्ये घोळ?नवीन टाकीचे बांधकामच नाही! जुन्या टाकींना लीकेज!
बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील पाडळी या गावांमध्ये 16 कोटी रुपयाची जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजना सुरू करण्यात आली.16 कोटी रुपये ही रक्कम अगदी अजिंठ्यावरून पाडळीला पाणी आणायचे म्हटले तरी पुरेशी ठरेल एवढी मोठी असताना, पाडळी पवार मध्ये मात्र अजूनही पाण्याची समस्या अगोदर होती तेवढी किंवा त्यापेक्षाही मोठी झाल्याची दिसून येत आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजनेअंतर्गत नळाचे स्वच्छ पाणी प्रत्येक घराघरात पोहोचेल असे अभिप्रेत असताना पाडळीमध्ये जल जीवन मिशनलाच घर- घर लागल्याचे दिसून येत आहे .पाडळीमध्ये या योजनेअंतर्गत जे काम झाले आहे त्या कामाबाबत गावकरी समाधानी नसल्याचे दिसून येत असून या संपूर्ण कामाची योग्य प्रशासकीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
जल जीवन मिशन योजना राबविताना संबंधित कंत्राटदाराकडून वापरण्यात आलेल्या पाईप चा दर्जा, गावात अगोदर तयार झालेल्या रस्त्यांची दुर्दशा करण्यात आली असून जल जीवन मिशन साठी वापरण्यात येणारी जी पाण्याची टाकी आहे त्यापैकी एक पाण्याची टाकी खूप जुनी असून दुसरी जलस्वराज योजनेअंतर्गत 2008-09 ला बांधलेली असल्याचे आढळून येते.या दोन्ही टाक्या कित्येक वर्षापासून वापरल्या गेलेल्या नसल्यामुळे त्यांच्यामध्ये लिकेजेस आहेत.परंतु जलजीवन मिशन मधून पैसा वाचवायचा की काही अन्य कारणामुळे पाडळी या गावात नवीन टाकी बांधण्यातच आली नसल्याचे गावाचे उपसरपंच जयेश पवार यांनी बोलतांना सांगितले.या गावातील उपसरपंच जयेश पवार हे तर इस्टिमेट मध्ये टाकीचा उल्लेखच नसल्याचे म्हणाले.आणखी विचारणा केली असता ते इस्टिमेट इंग्रजीमध्ये असून मला जास्त कळत नाही आणि इस्टिमेट कम्प्युटर ऑपरेटर याच्याजवळ असेल मला माहिती झाले की सांगतो असे उडवाउडविची उत्तरे देत होते.
जलजीवन मिशन अंतर्गत जवळजवळ सर्व गावांमध्ये पाण्याच्या नवीन टाक्या प्रस्तावित असताना पाडळी या गावाला अपवाद कसे बनवले गेले हे समजावून घेण्यासाठी संबंधित कंत्राटदार यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा न. नेहमीप्रमाणे लागत नाही.परंतु एकंदरीत पाडळी या गावांमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत झालेले काम हे संशयाच्या भवऱ्यात असून यात काही आर्थिक देवाण-घेवाणीचा प्रकार तर नाही? याबाबत संशय निर्माण होत आहे.



