विचारशक्ती कुंठली की …?*
राज्याच्या विधानसभेचे निकाल बाहेर आले. यावेळी मतदारांनी लोकसभा निवडणुकीत जी भूमिका घेतली होती त्याच्या अगदी थेट विरोधी भूमिका घेत महायुतीला अभूतपूर्व, अकल्पनीय विजय बहाल केला आहे. खरे तर लोकसभा निवडणूक सहा महिन्यांपूर्वीच पार पडली होती. इतक्या कमी कालावधीत लोकांचा कल इतक्या मोठ्या प्रमाणात कसा काय बदलू शकतो? या सहा महिन्यात लोकांचे असे कोणते प्रश्न सुटले? सहा महिन्यांपूर्वी ज्या शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात मोदींच्या भाजपला मतपेटीतून मोठा विरोध दर्शविला होता, मोदी सरकारच्या, राज्य सरकारच्या शेतकरी धोरणांचा मतपेटीच्या माध्यमातून निषेध केला होता,त्या शेतकरी वर्गाला या सहा महिन्यात असा कोणता मोठा दिलासा मिळाला?
महायुतीच्या या विजयात ‘लाडकी बहिण’ योजनेचा मोठा हात असल्याचे सांगितले जात आहे, तसे असेल तर लोकांच्या समस्या दीड हजार किमतीच्या होत्या असेच म्हणावे लागेल. केवळ शेतकरीच नव्हे तर तरूण बेरोजगार, छोटे-मोठे व्यापारी, सामान्य जनता सरकारच्या कारभाराला कंटाळली होती. सामान्य जनता महागाईने त्रस्त होती तर शेतकरी त्यांच्या उत्पादनाला भाव मिळत नसल्याचे असंतुष्ट होता.विविध करांच्या जंजाळाने व्यापारी वर्ग त्रस्त होता, तर शिक्षित असूनही हाताला काम नसल्याने बेरोजगार तरूण अस्वस्थ होता.
राज्यातील जवळपास महत्वाचे 20 प्रकल्प गुजरातला नेल्या गेले त्याद्वारे महाराष्ट्र हा कंगाल झालाय. शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, राज्यावरील कर्ज बे तुफान वाढले, बलात्कार गुंडागर्दी भ्रष्टाचार यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झाली, राजकीय वातावरण दूषित झालेले आहे, पन्नास खोके एकदम ओके याद्वारे सत्ता बदल करण्यात आला, गेले अडीच वर्ष संपूर्ण असंविधानिक सरकार राज्यात बसलेले आहे, राज्यातील कित्येक महत्त्वाच्या जागा अडाणींना विकण्यात आल्या, सहा महिन्यांपूर्वी हेच चित्र होते आणि आताही त्यात फारसे अंतर आले नव्हते.तरीहि हा निकाल लागत असेल तर ही बाब विचार करण्यासारखी नक्कीच आहे.
मा. श्री. प्रकाश पोहरे.



