विरोधी पक्षाचे तिकीट ना. जाधव व आ. कुटे यांनी फायनल केले.
संजय गायकवाड यांचे नामदार प्रतापराव जाधव यांच्यावर आरोप..
विधानसभा निवडणुका पार पडल्या.राज्यभरात महायुतीने प्रचंड मोठे यश मिळवले तसेच यश बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा महायुतीने मिळवले.परंतु महायुतीतील शिंदे शिवसेना गटातील दोन जागांपैकी संजय गायकवाड यांची एकच जागा निवडून आली व तीही अतिशय अल्प फरकाने…केवळ ८४१ मतांच्या फरकाने.
आजपर्यंत कुठल्याही आमदाराला शक्य झालं नाही असा अभुतपूर्व विकास आपण बुलढाणा शहर व मतदार संघासाठी केला असे आमदार संजय गायकवाड यांनी अगोदरच घोषित केले होते.त्यामुळे ही निवडणूक आपल्याला अतिशय सोपी जाणार असल्याचे व आपण खूप पुढे आहे असे कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले होते.परंतु मतमोजणीच्या दिवशी सहसा कोणालाही न गिनणारे संजू भाऊ यांनाही चांगलाच घाम फुटल्याचे दिसून आले.शेवटी त्यांचा विजय झाला परंतु हा विजय “तो” आनंद देऊन गेला नाही.
आज स्वागताच्या एका कार्यक्रमाला संबोधित करत असताना, आमदार संजय गायकवाड यांच्या मनातील जखम भळभळली आणि त्यांनी आपल्या मनातील शल्य बोलून दाखवले.आपल्या पराभवाच्या समीप असलेल्या विजयाचे कारण देताना आमदार संजय गायकवाड यांनी थेट मंत्री महोदय प्रतापराव जाधव व भाजपचे आमदार संजय कुटे यांच्यावर आरोप केले.मंत्री प्रतापराव जाधव व आ. संजय कुटे यांनी आपल्या विरोधातील कॅंडिडेटचे तिकीट फायनल केले असा आरोप आ. संजय गायकवाड यांनी केला.त्यामुळे शिवसेना शिंदे गटांमध्ये त्याचप्रमाणे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र दिसून आले.
आपल्याला आपल्या मित्र पक्षांकडून कोणतीच मदत मिळाली नाही मी फक्त एकट्याच्या भरोशावर व कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर निवडून आलो असे संजय गायकवाड म्हणाले.भाजपाच्या बुलढाण्यातील लोकांनी मला कुठलीच मदत केली नसल्याचा आरोप आ. संजय गायकवाड यांनी केला.
आता त्यांच्या या आरोपाला मंत्री महोदय प्रतापराव जाधव व आमदार संजय कुटे जे मंत्री होऊ शकतात हे कशाप्रकारे उत्तर देतात हे पाहणे मनोरंजनाचे ठरेल.



