सुनील वायाळ व हरिभाऊ परिहार यांनी घेतला बलदेवसिंह सपकाळ यांच्या ‘ त्या ‘ पत्रकाचा खरपूस समाचार..
चिखली : स्वतःला भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणणाऱ्या बलदेवसिंह सपकाळ यांनी जुन्या कार्यकर्त्यांना भाजपात डावलले जात असल्यासह आ. श्वेताताई महाले यांच्यावर वैयक्तिक आरोप करणारे एक पत्रक नुकतेच माध्यमांमध्ये प्रसिद्ध केले आहे. या पत्रकात सपकाळ यांनी केलेले सर्व आरोप हे पूर्णपणे खोटे आहेत.
श्वेताताईंनी केलेल्या शिफारशीमुळेच शासकीय समितीवर नेमणूक झालेल्या बलदेवसिंह सपकाळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे त्यांना पदावरून काढण्यात आले. हा राग मनात धरून सपकाळ हे बेछुट आरोप करत सुटले आहेत.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या हातून आपल्या जेसीबीचे उद्घाटन करणाऱ्या सपकाळ यांच्या या तथाकथीत आरोपांमागे बोलवता धनी कोण आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आ. श्वेताताई महाले यांच्यावर असे व्यक्तीद्वेषातून आरोप करणाऱ्या व पक्षशिस्त मोडीत काढणाऱ्या, अवास्तव मागण्या पूर्ण न झाल्यामुळे काँग्रेसशी घरोबा करणाऱ्या बलदेवसिंह सपकाळ यांच्या तोंडी निष्ठेची भाषा शोभत नाही, ” बलदेवसिंह सपकाळ हे वागणं बरं नव्हं ” अशा शब्दात भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख सुनील वायाळ व चिखली शहराध्यक्ष हरिभाऊ परिहार यांनी सपकाळ यांच्या ‘ त्या ‘ पत्रकाचा चांगलाच खरपूस समाचार घेतला
कलावंत मानधन समितीच्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आल्यानंतर. या शासकीय पदाचा तुम्ही गैरवापर केला. तुम्ही अनेकांकडून पैसे मागितल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या; त्यामुळे नाईलाजाने तुमचे हे पद गेले याचा राग मनात धरून तुम्ही आ. श्वेताताई महाले यांच्यावर आरोप करत आहात असे सुनील वायाळ आणि हरिभाऊ परिहार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. फक्त सत्ता आली की पदाचे लाभ मिळवायचे एवढेच तुमचे पक्ष कार्य आहे,
ग्रामपंचायत निवडणुकीत तुम्हाला २६ मते पडली, तुमच्या मागे ७००० लोक कुठून उभे राहणार ? असा प्रश्न या पत्रकातून सुनील वायाळ व हरिभाऊ परिहार यांनी बलदेवसह सपकाळ यांना विचारला आहे. स्वतःच कृतघ्न आणि भ्रष्टाचारी असलेल्या बलदेवसिंह सपकाळ यांच्या तथाकथित आरोपांचे भाजपचा एकही निष्ठावान कार्यकर्ता समर्थन करणार नाही असा विश्वास व्यक्त करत त्यांच्या या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये असे आवाहन देखील वायाळ व परिहार यांनी केले आहे.
*नवी सोयरीक तुम्हाला लखलाभ असो.*
भारतीय जनता पक्षाने तुम्हाला वेळोवेळी मानसन्मान दिला परंतु आपल्या वैयक्तिक मागण्या पूर्ण न झाल्यामुळे तुम्ही काँग्रेस सोबत घरोबा करून राहुल बोंद्रे यांच्याशी सलगी केली. खरे तर तुमच्या नव्या जेसीबीचे उद्घाटन राहुल बोंद्रे यांच्या हस्ते झाले, तेव्हाच तुम्ही भाजपच्या आचार विचारांना सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसवासी झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करा; तेवढेच बाकी राहिले आहे ! कारण, तुमचे ते पत्र काँग्रेस कार्यकर्तेच जास्त व्हायरल करत असून भ्रष्टाचारी पक्ष व शेतकऱ्यांची जिल्हा बँक बुडवणाऱ्या भ्रष्टाचारी नेत्यासोबतची तुमची ही नवी सोयरीक तुम्हाला लखलाभ असो असा टोला सुनील वायाळ आणि हरिभाऊ परिहार यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकातून बलदेवसिंह सपकाळ यांना लगावला आहे.



