4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

“श्री गणेशा”….अंतरंग दाखविण्यासाठी हा आरसा, “बुलढाणा दर्पण” !

जय जयाशी गणपती
मज द्यावी विपुल मती..
करावया तुमची स्तुती,
स्फूर्ती द्यावी मज अपार !

पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात चाळा,                पुष्पहारांच्या घातल्यात माळा..
ताशांचा आवाज तर्रारा झाला,
गणपती माझा नाचत आला !

आलास, अन् “गणपती बाप्पा मोरया”चा जयघोष होऊन मना-मनांवर विराजमान झालास. तुझं येणं, अन् उत्साहात न्हाऊन जाणं.. जणू एक समीकरणच आनंदी जगण्याचं. तू दुःखहर्ता तू सुखकर्ता, तू अवघ्या दीनांच्या नाथा.. म्हणूनच “बाप्पा मोरया रे” म्हणत ठेवल्या जातो तुझ्या चरणी माथा.. शनिवार ७ सप्टेंबर ते मंगळवार १७ सप्टेंबर पर्यंत आता तुझा निवांत मुक्काम होणार, त्यात मध्ये तीन दिवस महालक्ष्मी सुद्धा येणार!

उत्सवाचे हे उत्साही दिवस, त्यात कोसळत असलेला पाऊस, कधी मध्येच पडणारं ऊन. वाहू लागलेले नदी-नाले अन् तुडुंब भरलेल्या जलाशयावर हवेची झुळूक येताच उडणारे हळुवार तरंग, डोंगर माथ्यावरून दरीच्या कुशीत झेपावणारे धबधबे.. नमोमंडपी दाटून आलेल्या ढगांभोवती तोरण बांधलेल्या आकाशात इंद्रधनुचा विणलेला सप्तरंगी गोफ, फडफड करूनी थकलेल्या पंखांना सावरताना होणारा पाखरांचा किलबिलाट, हिरव्या कुरणी चरणाऱ्या सुंदर हरणी.. अशा निसर्गरम्य वातावरणात बाप्पाचं आगमन होत असल्यामुळे, आनंदाच्या डोहात आनंद तरंग फुलविणारा ठरणार आहे हा.. गणेशोत्सव !

शुभकार्याचा श्रीगणेशा, श्री गणेशाच्या प्रार्थनेनं करावा.. अशी आपली संस्कृती. त्यात आज श्री गणेश चतुर्थीचा पावन योग. याच योगावर सुरू होत आहे.. “बुलढाणा दर्पण“.. हे आपल्या हक्काचं वाचनमूल्य असणारं पोर्टल. माहिती व तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक जगात व हे विश्व आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे वळून आपली कुस बदलत असताना, त्या कुशीतला उबदारपणा कायम ठेवून परंपरा व आधुनिकता याचा समन्वय साधत.. आम्ही आपल्या मनाच्या हळव्या कोपऱ्यात विसावण्यासाठी येत आहोत, आपण सामावून व सांभाळून घ्याल, या दृढ विश्वासासह !

“बुलढाणा दर्पण” हे पोर्टल म्हणजे “व्ह्यूज अँड न्यूज”साठीच टीआरपी वाढविण्याचा केलेला खमंगपणा नव्हे. पूर्वग्रहदूषितपणा त्यात नसेल, तर असेल फक्त ती वास्तविकता. दर्पण म्हणजे आरसा.. व त्यातून सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, क्रीडा, कला, नाट्य, साहित्य, काव्य, समीक्षा, ज्ञान, मनोरंजन, साधना, आराधना.. या सर्वांचे अस्सल प्रतिबिंब त्यात उमटेल. ज्यात सल असते, तेच अस्सल होतं.. ती सल अन् ती ओल, येईल अंत:करणापासून खोल.. प्रयत्न आहे यत्न म्हणून स्क्रीनवर उतरण्याचा. आम्ही उथळ बातम्या आणि घटनांचे चमचमीत वार्तांकन करण्यापेक्षा, तुम्हाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करू प्रसार माध्यमांच्या वेगळ्या विश्वात. यात वास्तवाची भूपाळी असेल, अन् विदारकतेची “आरोळी”ही असेल.. यात मंत्र-तंत्र-यंत्र, बरंच काही असेल अत्र-तत्र- सर्वत्र. त्यासाठीचा शाब्दिक खटाटोप, बुलढाणा दर्पण..

एक आईना ऐसा भी होना चाहिये..
जो चेहरा नही, नियत दिखा दे !
तेच अंतरंग दाखविण्यासाठी हा आरसा,                  बुलढाणा दर्पण !

आम्ही आलोय, बाप्पांसवे..
गणपती बाप्पा मोरया 🙏

शब्दांकन.. ✍️ राजेंद्र काळे

संपादक: राजेंद्र घोराडे

 

Related Articles

ताज्या बातम्या