4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

जयश्रीताई, हरलात पण मनं जिंकून गेलात..* महाविकास आघाडीला नडला विजयाचा अविर्भाव!

*जयश्रीताई, हरलात पण मनं जिंकून गेलात..*

महाविकास आघाडीला नडला विजयाचा अविर्भाव!

*जयश्रीताई हरल्या, असा निसटता पराभव नक्कीच चटका लावून जातो.. तसा तो गेलाही, अगदी संबंध जिल्ह्याला. संजुभाऊ आले त्याचा अनेकांना आनंद आहेच, पण जयश्रीताई हरल्या याचेही कमालीचे दु:ख. ही लढाई म्हणजे ’कोण निवडावं?’ या वळणावरची होती. बरं मतदानात पसंतीक्रमही नव्हता, कोण्या एकालाच निवडून द्यायचं होतं. त्यात संजुभाऊंमागे ९१,६६० मतदार गेलेत, तर जयश्रीताईंमागे ९०,८१९ मतदार. ८४१ जास्त मतदार भाऊंकडे गेल्याने त्यांचा विजय झाला, तर ताई हरल्या.. पण मनं जिंकून गेल्या. हा निसटता विजय बुलढाण्यात संजुभाऊ म्हणा की, चिखलीत श्वेताताई.. यांना फारसा आनंदी करु शकला नसलातरी, पराभवही स्विकारला तो जयश्रीताईंनी आनंदाने!*

_आ.संजय गायकवाडांना कोण टक्कर देवू शकतो?.. या प्रश्नाला बुलढाणा विधानसभा मतदार संघातूनच काय, जिल्ह्यातून एकच उत्तर येत होते- जयश्रीताई शेळके. जवळपास दीड२ वर्षांपासून तसा ‘नरेटीव्ह’ सेट झाला होता, विविध सर्व्हेमधूनही प्रतिस्पर्धी म्हणूनही जयश्रीताईंचेच नाव पुढे यायचे. अगदी लोकसभेतही जयश्रीताई प्रतिस्पर्धी असत्यातर निकाल वेगळा आला असता, असे जनमत होते. हा जनमाचा दबाव म्हणा की, जयश्रीताईंच्या जनसंपर्काचा प्रभाव.. ही जागा ज्या शिवसेना उबाठा.कडे होती, त्यांचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना जालींधर बुधवतांना दिलेला ‘शब्द’ थांबवून जयश्रीताईंना उमेदवारी देणे ही गरज बनली. काँग्रेसमधून ताई उबाठा.त गेल्यात. एका हातात शिवबंधन बांधून दुसर्‍या हातात एबी.फॉर्म घेऊन आल्यात. दणक्यात अर्ज भरला, काँग्रेसमधील काही नाराजांना राजी करत *ताई आपल्या हक्काची* या टॅगलाईनने प्रचार सुरु झाला. आक्रमक सभांनी अन् तुफान रॅल्यांनी माहौल बनला. उद्धव ठाकरे- सुषमा अंधारे येवून गेले, मुकुल वासनिक तर दोनदा.. ताई प्रचारात अन् साहेब नियोजनात.. सारं ठरल्याप्रमाणं होत होतं. पुढे बलाढ्य उमेदवार असतांनाही टेक-ओव्हरटेक सुरु होते, निवडणुकीतच काय अगदी मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत.. सहज वाटणारी ही निवडणूक काळजाचे ठोके वाढवत होती, पण अखेर ताई पराभूत झाल्यात.. अवघ्या ८४१ मतांनी. खरंतर महाविकास आघाडी पुर्ण प्रचारादरम्यान ही निवडणूक जनतेनं हाती घेतली आहे, असं सांगून विजयी झाल्याच्या अविर्भावात वावरत होती.. तोच ओव्हर कॉन्फीडन्स त्यांचा घात करुन गेला, विरोधी उमेदवाराला ओव्हरटेक करतांना. तोंडापर्यंत आलेला घास हिरावल्या गेला. मर्दानीसारख्या लढलेल्या जयश्रीताई, हरल्यात पण मनं जिंकून गेल्यात!_

आ.संजय गायकवाड यांची विकास कामं, स्मारकांच्या माध्यमातून त्यांनी बांधलेली विविध जाती-धर्मांची मोट, त्यांची बेधडक शैली अन् जीवावर उदार होणार्‍या कार्यकर्त्यांचा फौजफाटा.. त्यातल्या त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी असलेले थेट कनेक्शन, यामुळे गायकवाड विरुध्द कोण? हे तसंतर विरोधकांपुढे आव्हानच होतं. जालींधर बुधवत, हर्षवर्धन सपकाळ, संजय राठोड.. ही नावंही होतीच. पण सातत्यपुर्ण जनसंपर्क व चळवळीचा चेहरा म्हणून जयश्रीताईंना जनमाणसाची पसंती होती. दिशा बचत गटाच्या माध्यमातून त्या अ‍ॅक्टीव्ह होत्या. सुख-दु:खात त्यांची हजेरी ठरलेली. घाटाखाली महिला जात नाही, पण या एकट्या ताई स्मशानात असायच्या. ग्राऊंड लेव्हलची जिद्द अन् चिकाटी काय असते? ती त्यांच्याठायी दिसत नाही. म्हणूनच की काय, जयश्रीताईंची प्रतिमा संजुभाऊंना टक्कर देण्यापर्यंत आली.

_जयश्रीताई मूळात आदर्श गाव सावरगावच्या, स्वातंत्र्य सैनिककन्या. सासरीही आल्या त्या भाऊसाहेब शेळकेंच्या घराण्यात. त्यामुळे माहेरी रुजलेली चळवळ सासरी वाढत गेली, तहसिलदाराची बायको म्हणून त्या शासकीय बंगला, शासकीय गाडी, भारी साडी.. अशा सुखवस्तू जीवन जगू शकल्या असत्या. पण त्या ओढल्या गेल्या जिजाऊ ब्रिगेड चळवळीकडे. याच आक्रमक वैचारीक चळवळीतून त्यांचे अनेकांशी खटकेही उडाले, अर्थात या चळवळीतील काही भाषणेही त्यांच्या या पराभवात सुप्तपणे दडलेली आहे. ब्राम्हणी विचारधारेचा वर्ग त्यांना पाडण्यासाठी न दिसता सक्रीय होता. २००९ला त्यांनी चिखलीतून शिवराज्य पक्षातर्फे उभे करण्यात आले, ज्यांनी उभे केले ते भारतभाऊंच्या मागे गेले. सुरुवातीला डोंगरखंडाळा जि.प. सर्कल मधूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. साखळी सर्कलमध्ये अखेरच्या क्षणी उमेदवारी मिळून पक्षांतर्गत अडथळ्यांमधून मार्ग काढत त्यांचा पहिला विजय झाला, २०१७ला वास्तविक त्या जि.प. अध्यक्ष पदाच्या दावेदार होत्या, पण त्या आमदारकीसाठी स्पर्धक होतील म्हणून त्यांचा पत्ता तिथेही कट झाला. राजकारणातल्या संघर्षाला त्यांनी फेडरेशनच्या माध्यमातून ‘दिशा’ दिली, अन् बचत गटांची चळवळ उभी केली. बचत गट मेळाव्यांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार दिला. एक महिला, राजकीय तर काही काळ पारिवारीक विरोधातूनही मार्गाक्रमण करीत होती, अर्थात या निवडणुकीत परिवार एक आला. २०२४च्या लोकसभेसाठीही प्रयत्न झाला, त्यावेळेस त्या उपहासाच्या धनी बनल्या.. पण त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदार संघ सोडलाच नाही. त्यांच्यावर आरोप झालेत, त्या काँग्रेसमध्ये आहेत.. वंचीतकडून प्रयत्न करतात, अपक्ष म्हणूनही लढण्याच्या तयारीत आहे तर तिकीट आणले मातोश्रीवर जावून.. खोके देवून तिकीट ओके केल्याचीही टिका झाली. हा सामाजिक पातळीवरुन राजकीय संघर्षाचा प्रवास, अन् तोही स्त्री-पुरुष समानतेच्या कितीही गप्पा होत असल्यातरी.. एक स्त्री म्हणून करणे सोपे नाही. काळ कितीही पुढे जाऊ द्या, स्त्री म्हणून मर्यादा येतातच!_

नामांकन अर्ज भरण्याच्या सभेपासूनच जयश्रीताई ‘अटॅक मोड’वर दिसल्या, त्या तुलनेत आक्रमक असणारे संजुभाऊ ‘डिफेन्स मोड’वर होते. मात्र कुठल्याही वेगवान यॉर्कवर बॅट घुमवायचीच नाही, हे जणु संजुभाऊंनी ठरवून ठेवलं होतं की काय? कारण क्लीनबोल्ड नाहीतर मागे काँग्रेसचे विकेटकिपर होतेच. जयश्रीताईंचा फुलस्पीड दिसला तो, उध्दव ठाकरेंच्या सभेत. ते एैकल्यानंतर आता मी काय बोलू? असा प्रश्न ठाकरेंनाही पडला. या सभेत हर्षवर्धन सपकाळांची ओपनिंगही रोहित शर्मासारखी होती, पण ही सर्व फटकेबाजी इथपर्यंत ठिक होती, जरी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात उध्दव ठाकरेंची सभा झाली असलीतरी ती माहौल बनवून गेली होती. पण पुढे काय होत गेलं, गायकवाडांवरंच हे आक्रमण प्रत्येक सभेत रिपीट होत गेलं. कदाचित आमदारांना उचकविण्याचा तो प्लॅनही असेल, पण धूर्त आमदार मोक्याच्या क्षणी चूप होते. काहीठिकाणी तर संजय गायकवाड यांच्यावरच्या या वक्तव्यांनी पातळी सोडली. छपरी-टपरी.. वाट्टेल ते एकेरी उल्लेख करुन बोलल्या जात होते. ही बुलढाणा विधानसभेची निवडणूक होती, मेहकर नगर पालिकेची नाही.. वाट्टेल ते बोलायला, पण याचे भान विशेषत: आघाडीच्या सभेत ठेवल्या गेले नाही.. अगदी जयश्रीताईंसारख्या उमेदवारांकडूनही. त्याचा साईड इफेक्ट असा झाला की, आमदार एवढे वाईट आहेत काय? असा प्रश्न जनमाणसात निर्माण झाला असता नकळत एक पॉझीटीव्ह एनर्जी संजय गायकवाडांबाबतीत सुप्तपणे निर्माण झाली. जी भाषा तशी आमदारांकडून अपेक्षीत होती, ती माजी आमदारांच्या तोंडी लोकांना पचनी पडली नाही. शेवटी एक प्रतिमा निर्माण झालेली असते, संजय गायकवाड यांच्या नेत्यांना दिलेल्या शिव्यांचेही लोकांना काही अप्रुप वाटत नाही.. पण जे कोणी शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करतात, त्यांच्याकडून अशी शिवराळ भाषा लोकांना पटत नाही. हे सर्व टळायला हवं होतं, ठाकरेंच्या सभेपुरतं ते ठिक होतं. त्यांचा परिणाम असा झाला की, विरोधकच प्रतिस्पर्ध्यांना पेनाल्टी देत राहिले.. मग पुढचेतर गोल करण्यात पटाईतच होते.

_हे ताईंच्या पराभवाचं विश्लेषण सुरु आहे, कोणाला ते पटेल न पटेल. जयश्रीताईंच्या रॅल्याही जोरदार सुरु होत्या. पण धामणगाव बढेच्या रॅलीतून फुग्यात हवा भरायला सुरुवात झाली, अन् देऊळघाटच्या रेकॉर्डब्रेक रॅलीने तो विजयाचा फुगा प्रचंड फुगला. या दोन्ही रॅल्या प्रचाराच्या नाहीतर विजयाच्या वाटल्या, गाडीच्या सनरुफमधून बाहेर येवून ताईही हवेत गेल्या. प्रचार रॅलीतून जमीन चालायचं असतं, रोड शो, विजयी रॅल्यांसाठी सनरुफमधून बाहेर येणं ठिक आहे. काय असतं, लोकं सर्व ऑब्झर्व्ह करत असतात. देऊळगावच्या रॅलीचा ‘इफेक्ट’ झाला की ‘साईड-इफेक्ट’ हा स्वतंत्र मुद्दा होऊ शकतो. कारण ही रॅली ‘बटेंगे तो कटेंगे’ची भावना दुसर्‍या वर्गात निर्माण करणारी ठरली असावी. कारण देऊळघाटमधून ताईंनी लीड काटलातरी, वरच्या खेड्यांमध्ये त्या अपेक्षीत बंपर लीड घेऊ शकल्या नाही. जी मतं कुठं जाणार नव्हती, त्यांच्यासाठी जास्त वेळ वाया गेला. त्यामुळं झालं काय, जिथं गरज होती तिथं वेळ दिल्या गेला नाही. संजय गायकवाड यांचेवर आक्रमण करताना त्यांच्या विकासावर टीका होत होती, पण आपण काय विकास करणार ? हे जनतेत जात नव्हतं, होतं ते फक्त प्रचार रथांच्या स्क्रीनवर.. की ज्या रथांपुढे आजकाल कोणी काळं कुत्रही थांबत नाही, उलट तिकडे संजय गायकवाड हे झालेला विकास केवळ 20% असून अजून 80 टक्के विकास बाकी असून.. काय काय करायचे हे प्लॅन सांगत होते व जनतेला ते पटतही होते, कारण त्यांनी करून दाखवलं होतं. नाहीतर सर्व्हे, सट्टा बाजार सारं सारं ताईंच्या फेवरमध्ये होतं, अशा परिस्थितीत एवढी धासून लढत व्हायलाच नको होती. ताईंकडे महाविकास आघाडीचा फौजफाटा होता, त्या तुलनेत संजय गायकवाड यांची लढाई एकट्याची होती. एक विरुध्द सारेच होते, पण तिकडे कैक निवडणुकांचा अनुभव होता. मतदान घरातून काढणारी सक्षम यंत्रणा होती. वंचीतही ५ हजाराआत थांबेल, असं वाटत असतांना ते ७ हजाराच्या पुढे गेले. लाडक्या बहिणींचा ‘प्रभाव’ होता, त्या तुलनेत ताईंकडे काही ‘अभाव’ निश्चित जाणवले. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात साहेब आजारी पडले, अन् शेवटच्या टप्प्यात ताई. औषध-गोळ्या घेवून लढणं चालू होतं. निवडणूक लढतांना जे-जे करावं लागतं, त्यातही कुठे कमी नव्हती. काही ‘उणिवा’ ह्या ‘जाणीवा’ ठेवून भरल्या जात होत्या. पण काठावर येतांना कुठेतरी शिग भरायची ती राहून गेली, अन् जयश्रीताईंचा ८४१ मतांनी पराभव झाला. जेवढ्या मतांनी बंटीदादा आमदार झाले होते, त्यापेक्षा जवळपास दुप्पट मते घेऊनही जयश्रीताई आमदार होऊ शकला नाही.. असो !_

विजयाचे बाप हजार असतात, पराभवाला कोणी वाली नसतो !!

_जयश्रीताई हरल्या, असा निसटता पराभव नक्कीच चटका लावून जातो.. तसा तो गेलाही, अगदी संबंध जिल्ह्याला. संजुभाऊ आले त्याचा अनेकांना आनंद आहेच, पण जयश्रीताई हरल्या याचेही कमालीचे दु:ख. ही लढाई म्हणजे ’कोण निवडावं?’ या वळणावरची होती. बरं मतदानात पसंतीक्रमही नव्हता, कोण्या एकालाच निवडून द्यायचं होतं. त्यात संजुभाऊंमागे ९१,६६० मतदार गेलेत, तर जयश्रीताईंमागे ९०,८१९ मतदार. ८४१ जास्त मतदार भाऊंकडे गेल्याने त्यांचा विजय झाला, तर ताई हरल्या.. पण मनं जिंकून गेल्या. हा निसटता विजय बुलढाण्यात संजुभाऊ म्हणा की, चिखलीत श्वेताताई.. यांना फारसा आनंदी करु शकला नसलातरी, पराभवही स्विकारला तो जयश्रीताईंनी आनंदाने!_

सुलेखन: श्री राजेंद्र काळे.

Related Articles

ताज्या बातम्या