सामान्य घरातील एक सामान्य माणूस यांच्याविरोधात उभा राहिला म्हणून विरोधकांना पोटदुखी!…. सिद्धार्थ खरात
अतिशय तळागाळातून,अतिशय उपेक्षित समाजातून,स्वकर्तुत्वाने एक मुलगा अधिकारी होतो.आपल्या तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत मंत्रालयाच्या कोणत्या टेबलवर कसे काम करून घ्यायचे? याची इतंभूत माहिती घेतो! आणी आपण कमावलेल्या ज्ञानाचा आपल्या लोकांना फायदा व्हावा,त्यातून आपल्या लोकांसाठी काही विधायक करता यावे! सरकार आणी सामान्य जनता यामध्ये असलेली मध्यस्थांची आणी भ्रष्टाचाराच्या ठेकेदाराची साखळी काढून टाकली की विकास जनतेपर्यंत पोहचतोच हे जाणून असल्याने समाजकारणात राजकारणात येण्याचा प्रयत्न करतो,तेव्हा एक आमदार जनतेचा मालक नसून सेवक असतो हे जनतेला कळले तर आपली परंपरागत राजेशाही धोक्यात येईल हे जाणून असल्याने त्याला संपवण्यासाठी या कित्येक वर्ष राजेशाही उपभोगलेल्या लोकांना एकत्र यावे लागते व त्यातून “काम खराब करता येत नसल्याने ते नाव खराब करण्याचा प्रयत्न जोरात करतात. असे प्रतिपादन मेहकर विधानसभा मतदारासंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री सिद्धार्थ खरात यांनी पत्रकार परिषदेत केले.

शिवसेना (उबाठा) संपर्क कार्यालय मेहकर येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सिद्धार्थ खरात यांनी त्यांची राजकीय आणि सामाजिक भुमिका स्पष्ट केली. त्याचबरोबर पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.पाठीमागच्या १५ वर्षांत मेहकर-लोणारच्या विकासाला एकप्रकारे अधोगतीचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. विकासाच्या बाबतीत मेहकर-लोणार हा इतर कोणत्याही मेट्रो सिटीच्या तुलनेत ५० वर्षे पाठीमागे आहे, असं म्हणायला हरकत नाही. मेहकर आणि लोणार मध्ये सध्या बेरोजगारी मोठ्या प्रमाणात उद्भवलेली आहे, याठिकाणी शिक्षण, आरोग्य आणि वाहतूकीच्या कोणत्याही आधुनिक सुविधा उपलब्ध नाहीत. अजुनही बऱ्याच गावात नीट रस्ते सुध्दा नाहीत, या सर्वांमुळे सर्वसामान्य जनतेचे जीवनमान खालावले आहे. लोणारचा विकास आराखडा देखील अजून रखडलेल्या अवस्थेत पडून आहे. या सर्व समस्यांकडे दुर्लक्ष करुन स्वतची घरं भरून घेण्याचं काम इथले लबाड सत्ताधारी करत आहेत. ते समाजात जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करुन निवडणूक लढतात, खोट्या मार्गाने त्या जिंकतात आणि मग सर्वसामान्य जनतेचा छळ करतात.
या सर्व समस्यांना सामोरे जाऊन आपल्याला ही लढाई जिंकायची आहे, त्यासाठी माझ्यासोबत मेहकर-लोणारमधील महाविकास आघाडीची सर्व नेतेमंडळी खंबीरपणे उभी आहे.त्यामुळे आम्हाला विजयाची खात्री असून विरोधकांना खोट्या प्रचाराचा आसरा घ्यावा लागत आहे.विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यासारखे काही नसल्याने पुन्हा जातीय आणी पक्षीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत.परंतु एवढ्या वर्ष सत्ता उपभोगूनही अगदी साध्या मूलभूत समस्याही सोडवता न आल्याने जनता यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.असेही सिद्धार्थ खरात म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे सरचिटणीस शामभाऊ उमाळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आशिष भाऊ रहाटे, डॉ. अनंत वानखेडे, डॉ. सतीश ताजने, राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मण मंजुळकर, शिवसेना मेहकर शहरप्रमुख किशोर भाऊ गारोळे, किसन पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, युवासेना तालुकाप्रमुख ॲड. आकाश घोडे, युवासेना शहरप्रमुख ऋषिकेश जगताप हे सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.



