1.5 C
New York
Tuesday, February 17, 2026

Buy now

spot_img
spot_img

राजकीय नेते सक्रीय…. प्रशासकीय यंत्रणा निष्क्रीय!✍️ राजेंद्र काळे

गणेशोत्सवाचे उत्साही दिवस, त्यात उद्या महालक्ष्मी आगमन, जैन धर्मीयांचे पर्युषण पर्वही सुरु आहे. अशा सणा-सुदीच्या वातावरणात आप्पाकडं क्रेडीटंच कार्ड असो की नसो, पण बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार ‘कोण हुकूमी एक्का?’ याचीच चर्चा असून, ‘लाडकी बहिण’ नंतर थोडीसी सुखावलेली महायुती बदलापूर अन् मालवण प्रकरणानंतर बॅकफूटवर गेलेली असतांना, पुन्हा फ्रंटवर येण्यासाठी वेगवेगळ्या पॅनल्टीज शोधून ‘गोल’कडे कसं झेपायचं, या चिंतेत म्हणा की चिंतनात? दिसत आहे!_

राजकारणाच्या पटलावरील सर्वपक्षीय नेते कमालीचे सक्रीय दिसत आहे. बुलढाणा विधानसभा मतदार संघात आ.संजय गायकवाड यांच्याविरोधात जणु महाविकास आघाडीने आघाडीच उघडली आहे. प्रत्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अन् आ.संजय गायकवाड समर्थक यांच्यात ‘सोशल वॉर’ पेटले आहे. गायकवाडांची गाडी सुरक्षेतील पोलिस धूत असतांना ‘फवारा’ सपकाळांनी उडवताच, गायकवाड यांनी ‘उलटी’ मारत पलटवलेली बाजी.. पुढे गायकवाड समर्थकांनी सपकाळांचा काढलेला मुंबईतील १०० कोटींचा बंगला, त्याला गायकवाड यांचे फार्म हाऊसची शेती काढून सपकाळांनी दिलेले आव्हान.. त्यातच जयश्रीताई शेळके यांनी महापुरुषांच्या पुतळ्यांच्या स्ट्रक्चरल ऑडीटची केलेली मागणी, त्याचे ऑडीट आधीच झाल्याचे संजय गायकवाड यांनी दिलेले उत्तर, तिकडे उबाठा.कडून जालींधर बुधवत यांनी काढलेली मशालयात्रा, शिंदे सेनेच्या प्रेमलता सोनोने यांनी तिकीटाची मागणी करुन दाखविलेले आस्तीत्व.. अशाप्रकारे चोहीबाजूंनी आ.गायकवाड यांना घेरण्याचा प्रयत्न होत असतांना, मी कोणालाच मोजत नाही.. ही संजय गायकवाड यांनी सर्वांची काढलेली किंमत, त्यात आता त्यांनी १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री व २ उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मारक लोकार्पणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

‘एकच वादा, दोन नंबरवाल्यांचे दादा..’ असा थेट हल्लाबोल दिलीपकुमार सानंदा यांनी आ.आकाशदादा फुंडकर यांच्यावर करुन खामगाव मतदार संघाच्या वातावरणात राजकीय गरमी आणलेली. चिखली मतदार संघ कायम तापलेला असतो, सिध्दार्थ खरात यांनी उबाठा.मध्ये प्रवेश घेवून मेहकर मतदार संघात एक आव्हान उभे केले आहे. सिं.राजा मतदार संघ संभ्रमीत आहे, त्यात तिथेच रविकांत तुपकरांनी अन्नत्याग आंदोलन सुरु करुन आंदोलनासह राजकीय ठिणगी टाकून दिली आहे. जळगाव जामोद मतदार संघात आघाडीतील बिघाडी कायम असल्याने महायुती सध्यातरी ‘टेन्शन फ्री’ दिसते. मलकापूरात भाजपाचे तिकीट कोणाला मिळणार? हाच यक्षप्रश्न असून एखादेवेळी प्रभावी अपक्षसुध्दा लढतीत टेंगुळ आणण्याची चिन्हे आहेत.. एकूणच, कायतर गोलीगत!

_राजकीय नेते सक्रीय असतांना, प्रशासकीय यंत्रणा मात्र निष्क्रीय दिसत आहे. एकतर जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना कोणी मालकच उरले नाही. जिल्हा परिषदेत सीईओं.ची संगीत खुर्ची बनली आहे. नुसता मनमर्जी कारभार सुरु आहे प्रशासनाचा, एकटे आमदार सांभाळायचे.. बाकी टेन्शन फ्री. बरं ही परिस्थिती खालीच नाहीतर, वर मंत्रालयात सुध्दा आहे. म्हणून मंत्रालयीन अधिकार्‍यांना वैतागून मंत्रालयाच्या सातव्या माळ्यावरील गच्चीवर आ.संजय गायकवाड यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. तिकडे तुपकरांचा अन्नत्यागही प्रशासनाने आधी वार्‍यावरच सोडला होता, शेवटी त्यांनीच उपोषण सोडले. एकूणच परिस्थिती, राजकीय नेते सक्रीय.. प्रशासकीय यंत्रणा निष्क्रीय!_

▪️ प्रशासकीय यंत्रणा निष्क्रिय..

_खेळ मांडला, अगदी सर्वत्रच.. गणेशोत्सव व महालक्ष्मी पुढे वेगवेगळे खेळ मांडल्या जातील आता. हेच खेळ महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जागतं मन दाखवतात. पण या मनाला आनंद देणार्‍या खेळापेक्षा सध्या राजकीय तथा सामाजिक वातावरणात जे खेळ मांडल्या जातात, त्यातून होणारा खेळखंडोबा मोठ्या प्रमाणावर प्रतिबिंबीत अन् प्रतिध्वनीत होवून वातावरणाला वेगळा रंग देवून जातो. सध्याच्या राजकारणात साधारणत: परिस्थितीच अशी आहे की, खेळ मांडला!_

खेळ मांडला, ज्याने-त्याने त्याच्या-त्याच्या परीनं. कायम इलेक्शन मोडवर असणार्‍या चिखली विधानसभा मतदार संघात काँग्रेस असो की भारतीय जनता पार्टी, दोन्हींकडून मांडल्या जातो तो दहीहंडीचा खेळ. या खेळात अभिनेत्रींना बोलावून चालते ती, राजकीय चढाओढ!

_अन्य मतदार संघात आरोप-प्रत्यारोपांचे खेळ मांडून राजकीय शह-प्रतिशहाचे डाव रंगत आहे. आंदोलनं, यात्रा-जत्रा यांचेही खेळ राजकीय पटलावर सुरु आहे. प्रत्येकजण डाव मारण्याच्या अन् बाजी पलटविण्याच्या तयारीत असतो. हे खेळ अर्थात डाव कमीत कमी दिसतात, किंवा जाणवतात तरी. पण हल्ली बहुतांश ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाच्या ठिकाणी मांडले जाणारे पत्त्यांचे डाव, अन् त्यातून रात्र-रात्र रंगणारा जुगार.. हा वेगळाच चिंतेचा विषय सामाजिक पातळीवर आहे. अनेकठिकाणी पडद्यामागे दारु अन् बिअरच्या बाटल्या दिसतात नंबर दोनच धंदे करणार्‍यांकडून जास्तीत जास्त वर्गणी गोळा करुन लाटल्या जाते. अशा जमा होणार्‍या पैशांमधून मग काय होणार? मूळातच सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना ही सामाजिक प्रबोधनासाठी होती, राष्ट्रविषयक उद्बोधनासाठी होती.. त्यावेळी घरातले गणपती चौकात आणल्या गेले, आज चौकातील गणपती घरी नेवून ठेवावे.. अशी वेळ आलीयं. यावर मंथन कोण करणार? टेम्पल अन् फेस्टीवल पॉलिटीक्सच्या या जमान्यात ज्या वर्गाकडून परिवर्तनाची अपेक्षा असते!_

ज्यांच्याकडून समाज सुधारणेची अपेक्षा असते तेच गैरवर्तन करणार्‍यांना पाठबळ देत असतीलतर? त्यामुळे सर्वत्र दिसते कायतर, खेळ मांडला!!

Related Articles

ताज्या बातम्या