चिखलीत ‘बोंद्रे घराणेशाही’चा प्रभाव कमी,भाजप एकजूट, काँग्रेस बंडखोरीत अडकली
चिखली : आगामी नगरपालिका निवडणुकीत चिखलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ दिसून येत असून या सर्व घडामोडींमध्ये ‘बोंद्रे घराणेशाही’चा दबदबा लक्षणीयरीत्या कमी होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शहरात काही कामांबाबत नागरिकांकडून तक्रारी होत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत आमदार महाले यांनी संबंधित विभागांना थेट जाब विचारला आहे. भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जा आणि निष्काळजीपणाबाबत जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश त्यांनी दिल्यानंतर प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात मोठी हालचाल निर्माण झाली.आमदार महाले यांनी “भ्रष्टाचाराला कोणतीही मुभा दिली जाणार नाही,” असा स्पष्ट संदेश देत त्यांनी कामामध्ये कोणताही भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही असे सुनावले.
भाजपमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून नगराध्यक्षपदासाठी पंडितराव देशमुख यांच्या उमेदवारीवर पक्ष एकदिलाने एकवटला आहे. आमदार महाले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व एकजूट निर्माण झाली असून गटबाजीचा मागमूसही दिसत नाही. त्यामुळे भाजपला निवडणुकीत सरस स्थान मिळावे अशी स्थिती निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, काँग्रेसमध्ये मात्र परिस्थिती पूर्णपणे उलट आहे. उमेदवारी प्रक्रियेत झालेल्या कथित पक्षपाताविरोधात अनेक इच्छुकांनी बंड खांद्यावर घेतले आहे. बोंद्रे घराण्याच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत काही वरिष्ठ कार्यकर्त्यांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याने काँग्रेसमध्ये गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे.या बंडखोरीचा थेट परिणाम म्हणून काँग्रेसची मते विभागण्याची शक्यता वर्तवली जात असून त्याचा फायदा भाजपला मिळू शकतो, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.
एकूणच, चिखलीच्या राजकारणात बोंद्रे घराण्याचा पारंपरिक प्रभाव डळमळीत झाला आहे, तर आमदार श्वेता महाले यांच्या आक्रमक आणि ठाम नेतृत्वामुळे राजकीय समीकरणे जलद गतीने बदलत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.



