प्रत्येक घराला शुद्ध व पुरेसे पाणी, पाणीपुरवठा व्यवस्थेत हाच प्राधान्यक्रम…डॉ. संध्या कोठारी
चिखली शहरातील प्रत्येक घराला पुरेसं आणि शुद्ध पाणी मिळावं, हा आपला प्रमुख ध्यास असल्याचे डॉ. सौ. संध्या कोठारी यांनी सांगितले. नगरपरिषदेच्या माध्यमातून पाणीपुरवठा व्यवस्थेतील सर्व अडचणी सोडवण्यावर त्या भर देणार असून, या संदर्भात आधुनिक जलव्यवस्थापन प्रकल्प राबवण्याची तयारी सुरू आहे.
आमदार सौ. श्वेता ताई महाले पाटील यांनी चिखली शहराच्या नियोजित पाणीपुरवठा योजनेसाठी शेकडो कोटी रुपयांची भव्य योजना आणली असून, या माध्यमातून चिखली शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. या योजनेअंतर्गत शहरातील पाईपलाईनचे आधुनिकीकरण, जलसाठा क्षमता वाढवणे आणि गळतीमुक्त पुरवठा व्यवस्था उभारणे यासारख्या सुविधा नगरपरिषदेला पुरवल्या गेल्या आहेत.
डॉ. संध्या कोठारी म्हणाल्या, “आमदार श्वेता महाले यांनी नगर परिषदेला पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक व आर्थिक सुविधा पुरवल्या आहेत. त्यामुळे आता शहरात एकाही भागात पाण्याची टंचाई राहणार नाही. आमदारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही योजना जलद गतीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा देऊ.”
त्यांनी पुढे सांगितले, “शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर पाणीपुरवठा ही सर्वात मूलभूत गरज आहे. आमदार सौ. श्वेता महाले यांच्या विकासदृष्टिकोनाला सत्ताधारी वर्गाचा पाठिंबा मिळाल्यामुळे चिखलीचा पाणी प्रश्न आता इतिहासजमा होईल. नागरिकांनी ‘विकासासोबत आणि सत्यासोबत’ राहण्याचा विश्वास दाखवला आहे, हेच आमचे बळ आहे.”….



