असंवेदनशीलतेचा कळस…..
राहुल बोन्द्रे यांच्या श्रद्धांजली पोस्टला देखील घाणेरड्या राजकारणाचा “कुबट वास”…
चिखली: चिखलीमध्ये आयुर्वेद महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी चिखली क्रीडा संकुलमध्ये जलतरण तलावात बुडून मरण पावले.ही घटना अतिशय दुर्दैवी असून घटना कशी घडली? यासंबंधीच्या विस्तृत चौकशीचा अहवाल अजून बाहेर यायचा आहे.परंतु चिखलीचे माजी आमदार व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत शोक प्रकट करण्याचा प्रयत्न करतानाच विद्यमान आमदार सौ. श्वेताताई महाले यांचेवर काहीही संबंध नसतांना शिंतोडे उडवण्याचा आणी ओढूनताढून झालेल्या घटनेशी आ. सौ. श्वेताताई महाले यांचा बादरायन संबंध जोडण्याचा प्रयत्न केला.आपल्या फेसबुक पोस्टमध्ये माजी आमदार राहुल बोन्द्रे म्हणतात की,
“या जलतरण तलावाचा कंत्राट सुरुवातीला एका अनुभवी कंपनीला देण्यात आला होता पण मधल्या काळामध्ये या कंपनीची हकालपट्टी करून त्याच्या जागी चिखली आमदाराच्या मर्जीतील भाजपा कार्यकर्त्याला हे कंत्राट देण्यात आले. या भाजपा कार्यकर्त्याला जलतरण तलाव चालवण्याचा कुठलाही पूर्व अनुभव नाही. जलतरण तलावात पोहणाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लाईफ गार्ड, जॅकेट्स, व इतर अनेक गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.”
झालेली घटना अतिशय दुर्दैवी असून याबाबतीत सखोल चौकशी करून जे कोणी या घटनेसाठी जबाबदार असतील त्यांना योग्य ते शासन व्हायला हवेच,परंतु अशा घटनांचा देखील आपल्या राजकारनासाठी कुणी वापर करत असतील तर त्याला असंवेदनशीलतेचा कळस असंच म्हणावे लागेल.माजी आमदार राहुल बोन्द्रे यांनी ही साधनशुचिता पाळायला हवी होती,असंच मत सर्वसामान्य जनता आणी अगदी वरिष्ठ पत्रकारही व्यक्त करत आहेत.
या बाबतीत एक आठवण म्हणून साधारणतः दीड वर्षांपूर्वी कर्मयोगी तात्यासाहेब बोन्द्रे यांच्याशी संबंधित एका कार्यक्रमांच्या अनुषंगाने माजी आमदार राहुल बोन्द्रे यांनी त्यांच्या महाविद्यालय परिसरात जेवणाच्या ठेवलेल्या कार्यक्रमामध्ये,जेवणाची भांडी वैगेरे वाहतूक करताना एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता अशी चर्चा झाली होती.परंतु राजकारणात प्रखर विरोधी असतांना देखील तत्कालीन सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी उगाच “मसाला बातम्या” टाळल्या होत्या,आणी संवेदनशील राजकारण्यांकडून हेच अपेक्षित आहे.
परंतु सलग दुसऱ्या पराभवाने खचलेल्या राहुल बोंद्रे यांना ही घटना म्हणजे आपल्या मनातील आमदार महाले यांच्याविषयीचा राग बाहेर काढण्याची संधी वाटली,म्हणून त्यांनी अतिशय संवेदनशील घटनेमध्येसुद्धा आरोपाची घाण फेकली हेच दिसून येत आहे.
सदर घटनेविषयी शोक संवेदना व्यक्त करण्यासाठीआमदार सौ श्वेता ताई महाले यांनी सुद्धा फेसबुक पोस्ट केली आहे.पण त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये एका संवेदनशील लोकप्रतिनिधीच्या मानवी मनातून येणाऱ्या शोक संवेदना फक्त व्यक्त होत आहे.तर राहुल बोंद्रे यांच्या शोक संवेदनाच्या पोस्टमधून देखील राजकारणाचा कुबट वास येत आहे.अशीच चर्चा चिखलीतील सर्वसामान्य करताना दिसत आहेत.



