चिखली भाजप मध्ये निष्ठेची फळे: काँग्रेसमध्ये निष्ठावंतांना ‘केळे घ्या केळे’
निष्ठेला सन्मान की सत्तेसाठी तडजोड?
चिखली नगरपरिषद निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्यांना दिलेला सन्मान पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपचे शहराध्यक्ष सागर पुरोहित व पक्षाचे कट्टर कार्यकर्ते सुरेंद्रसिंह ठाकूर यांची भाजपाकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
निवडणुकीदरम्यान तत्कालीन राजकीय गरजेमुळे त्यांना उमेदवारी देता आली नव्हती. मात्र आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी माघार घेतली आणि पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत भाजपाचे नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या निष्ठेला आज अधिकृत सन्मान मिळाला.
आमदार श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये निष्ठा, विश्वास आणि कार्यकर्त्यांचा मान या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवले जाते, हे या निर्णयातून पुन्हा अधोरेखित झाले.
निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे बाजूला न पडता, पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य वेळी योग्य स्थान देण्याची ही राजकीय संस्कृती असल्याचे भाजप कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
याच्या नेमक्या उलट चित्र काँग्रेस आणि माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या गटात पाहायला मिळाले. काँग्रेसने नगराध्यक्ष पदासाठी तिकीट नाकारल्यावर प्राचार्य निलेश गावंडे यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून निवडणूक लढवली. त्या काळात त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर व राहुल बोंद्रे यांच्यावर गंभीर आरोप केले, काँग्रेसने आपल्याशी गद्दारी केल्याचे जाहीरपणे सांगितले. त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसचा नगराध्यक्ष उमेदवार पराभूत झाल्याची चर्चा शहरात रंगली.
मात्र, अशा परिस्थितीनंतरही त्याच काँग्रेस नेतृत्वाने प्राचार्य गावंडे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून नेमले. त्यामुळे काँग्रेससाठी प्रामाणिकपणे काम करणारे, काशिनाथ आप्पा बोन्द्रे यांच्यासाठी जीव ओतून प्रचार करणारे कार्यकर्ते मात्र बाजूला पडले. काँग्रेसच्या निष्ठावंतांना “तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले” अशी भावना निर्माण झाली आहे. काशिनाथ बोंद्रे, कुणाल बोंद्रे, सचिन बोंद्रे, दीपक देशमाने किंवा ज्यांच्या मतांवर लक्ष ठेवून राजकारण झाले त्या मुस्लिम समाजातील कुणालाही स्वीकृत नगरसेवक पद न देण्यात आल्याने नाराजी वाढली आहे.
या संपूर्ण चित्रातून चिखलीच्या राजकारणातील दोन वेगवेगळ्या वैचारिक प्रवृत्ती स्पष्टपणे समोर येतात. एकीकडे आमदार श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय, मान-सन्मान आणि संधी देतो; तर दुसरीकडे राहुल बोंद्रे व काँग्रेसकडून राजकीय उपयोगाच्या आधारे लोकांना जवळ घेतले जाते, अशी टीका राजकीय वर्तुळात होत आहे…



