नगराध्यक्ष पंडित दादा यांच्यासमोरील आव्हाने पार्ट-2
चिखली शहराला ट्रॅफिकमुक्तीचा वादा – काय करणार पंडितदादा ?
चिखली : 2011 च्या जनगणनेनुसार जरी चिखली शहराची लोकसंख्या मर्यादित दिसत असली, तरी 2026 पर्यंत शहराचा विस्तार आणि लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. या वाढत्या शहरावर सध्या सर्वात मोठा ताण पडतो आहे तो वाहतुकीचा. विशेषतः शहरातील मुख्य बसस्टँड परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते खामगाव चौफुली व खंडाळा चौफुलीपर्यंतचा मार्ग हा आज चिखलीतील सर्वात गजबजलेला आणि सर्वात अडचणीचा ठरला आहे.
या मार्गावर मोठ्या प्रमाणावर व्यापारी, दवाखाने, सहकारी पतसंस्था, किराणा दुकाने, चहाचे स्टॉल, मिठाई दुकाने यांची रांगच लागलेली आहे. महालक्ष्मी किराणा, बसस्टँडजवळील चहाची दुकाने, राजस्थानी मिठाई दुकाने, डॉक्टर यादव व डॉक्टर लोखंडे यांचे दवाखाने आणि अनुराधा अर्बन परिसर येथे दिवसभर वाहनांची वर्दळ असते. परंतु येथे येणारे वाहनधारक आपापल्या सोयीप्रमाणे दुचाकी व चारचाकी रस्त्यावरच उभ्या करतात.
यामुळे या संपूर्ण पट्ट्यात रस्त्याची रुंदी प्रत्यक्षात अर्ध्यावर येते आणि दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडीत अडकते. रुग्णवाहिका, शाळेची वाहने, बस, दुचाकी व पादचारी यांना अक्षरशः जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. अनेक वेळा या परिसरात अपघात घडले असूनही परिस्थितीत कोणताही ठोस बदल दिसून आलेला नाही.
नगरपरिषद आणि वाहतूक विभागाने कठोर पावले उचलली नाहीत, तर ही समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत जाणार आहे. दुकानदारांसमोरील बेकायदेशीर पार्किंग, रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या गाड्या आणि ‘कोणीही कुठेही उभे राहा’ या मानसिकतेवर आता आवर घालणे अत्यावश्यक झाले आहे.
नुकतेच नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारलेले पंडित दादा देशमुख यांनी चिखली शहराला ट्रॅफिकमुक्त करण्याचा शब्द दिला आहे. सामान्य नागरिकांचा चेहरा असलेल्या पंडित दादांसमोर ही पहिली आणि मोठी कसोटी आहे. मुकी-बिचारी पण रोज या त्रासाला सामोऱ्या जाणाऱ्या चिखलीकरांच्या या दुखऱ्या प्रश्नाकडे ते किती गांभीर्याने पाहतात आणि कोणते कठोर निर्णय घेतात, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



