11.8 C
New York
Friday, December 19, 2025

Buy now

spot_img
spot_img

आ.संजय गायकवाड यांचा विजय एैतिहासिक; पण काठावरच….आता खऱ्याअर्थाने गरज आत्मपरिक्षणाची !

आ.संजय गायकवाड यांचा विजय एैतिहासिक; पण काठावरच….आता खऱ्याअर्थाने गरज आत्मपरिक्षणाची !

One man Army

जिंकलात, हा विजय एैतिहासिकच आहे. अगदी एकट्याच्या बळावर खेचून आणलेलाही. म्हणूनच संगम चौकात पोस्टर झळकलं-वन मॅन आर्मी..आता मात्र या विजयानंतर अपेक्षा आहे ती खऱ्याअर्थाने, आत्मपरिक्षणाची!*

_काळजाचा ठोका वाढविणारा निकाल होता, बुलढाणा मतदार संघाचा.. संजय गायकवाड जिंकलेत ८४१ मतांनी, हा विजय या अर्थाने एैतिहासिक की..इतिहासात आतापर्यंत पहिल्यांदा आमदार बनून सलग दुसऱ्यांदा कोणी निवडून आले नव्हते, ते असाध्य साध्य करुन दाखवले संजूभाऊंनी. ९१ हजार ६६० मते त्यांना मिळाली, एवढी विक्रमी मते आतापर्यंत कोणालाच मिळाली नव्हती. २०१९ लाच गायकवाड यांनी ६७ हजार ७४५ मते घेतली होती. मागच्यावेळा त्यांच्या मतांची टक्केवारी होती ३७.८३ टक्के, यावेळी ती झाली ४७.०६ टक्के. म्हणजे २०१९ पेक्षा मतांमध्ये २३ हजार ९७५ मतांची वाढ झाली अन् मतांची टक्केवारी ९.२३ ने वाढली. हे सर्व विक्रमी पध्दतीने वाढत असातांना मताधिक्य मात्र त्यांचे घटले. २०१९ ला ते २६ हजार ०७५ मतांनी विजयी झाले, यावेळी म्हणजे २०२४ ते केवळ ८४१ मतांनी जिंकले. त्यांच्या प्रतिस्पर्धी जयश्रीताई शेळके यांनाही ९० हजार ८१९ मते मिळाली, ही मतांची टक्केवारी आहे ४६.६३. म्हणजे लढत झाली ती, काटे की टक्कर!_

आ.संजय गायकवाड जिंकलेत, त्यांची दणक्यात मिरवणूक निघाली. ‘बुलढाण्याचा एकच आवाज’ने शहर दणाणले. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, डिजेचा दणदणाट..रात्री उशीरापर्यंत विजयी जल्लोषाचा माहोल होता. पण मिरवणुकीच्या केंद्रस्थानी असणाऱ्या संजूभाऊंच्या चेहऱ्यावर जो उत्साह ओसंडून वाहायला हवा होता, तो दिसत नव्हता. केवळ कार्यकर्त्यांसाठी ते जल्लोषात सहभागी दिसत होते. हसत होते, मध्ये-मध्ये नाचत होते..पण ‘थोडक्यात वाचलो’ हा भाव दिसत नसलातरी त्यांच्या चेहऱ्याच्या आत दडलेला जाणवला!

_विजयातही काठावर निसटण्याची खंत त्यांच्या मनात येणं स्वाभाविक होतं. ३५ ते ४० वर्षांपासून रस्त्यावर, सेवेसाठी समर्पण, धर्मावर आलेल्या संकटात छातीची ढाल करुन पुढं जाणं, एक पाय घरात तर दुसरा पाय दवाखान्यात, असं धावून जाणं. लव्ह जिहादमधून मुलींची सोडवणूक, आभाळ कोसळलंतरी हजर अन् आगीत उडी घेण्यासाठीही तत्पर, अगदी स्मशानात मोफत जळतणपर्यंत सेवा.. हे तर झालं सामाजिक कार्य. पण आमदार बनल्यावर कोरोना व सत्तास्थापनेत गेलेला वेळ यानंतर मागच्या केवळ अडीच वर्षात त्यांनी जी झपाटल्यागत कामे केली, त्याची दखल २०-३० वर्ष मंत्री-आमदार राहिलेल्यांनीही घेतली. २६ महापुरुषांची स्मारक सौंदर्यीकरणासह, अनेक भवन, रस्ते, उपसा सिंचन, सभागृह, बुध्दविहार, शादीखाने, स्मशानभूमी, कब्रस्थान, व्यायामशाळा, ओपन जिम, अभ्यासिका, सीबीएससी शाळा, मेडिकल व अ‍ॅग्रीकचलर कॉलेज, मॉडेल डिग्री कॉलेज, विद्यापीठ उपकेंद्र..कमी शिकल्याचा आरोप होत असलेल्या या माणसाने अभ्यास करुन हा विकास ‘करुनच दाखविला..!’_

ज्या माणसाने विकासाचा विक्रम केला, त्या माणसाने विक्रमी मताधिक्याची अपेक्षा का बाळगू नये ? प्रचाराचं कामचं पडू नये, अशी अवस्था यायला हवी होती. पण झालं उलटचं, अगदी ईव्हीएमच्या शेवटच्या फेरीपर्यंतही विजयाची खात्री नव्हती. कर्मचाऱ्यांच्या बॅलेटमध्ये आ.संजय गायकवाड कमालीचे मागे होते, त्यांनी मागे कर्मचाऱ्यांविरोधात केलेल्या वक्तव्याचे कारण असावे कदाचीत. विषय वक्तव्याचा आलाच म्हणून, अशी अनेक वक्तव्ये निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनतात. त्यांचे मागचे अनेक व्हायरल ऑडीओ व व्हिडीओ प्रचारात विरोधकांकडून पुढे आले. कितीही नाही म्हटलंतरी त्याचा कमी-जास्त फटका बसतोच, बॅलेट व्होटींगवरुन ते जाणवलचं.

_ऐनवेळी शिवसेना उबाठा.ने जालींदर बुधवत यांना मागे सारुन जयश्रीताई शेळके यांना उमेदवारी देत जबरदस्त चाल खेळली. सामाजिक, आर्थीक अन् पुरोगामी चळवळीच्या पातळीवर जयश्रीताई प्रभावी. उमेदवारी अर्ज भरण्याच्या सभेपासून त्यांनी आक्रमक शैली अवलंबली, उध्दव ठाकरेंच्या सभेनंतर त्यांनी संजय गायकवाड यांना थेट शिंगावर घेतले. या वाक्युद्धात संजय गायकवडांना उचकविण्याचा प्रयत्न होत होता, हर्षवर्धन सपकाळांनीही तो केला.. त्यांनी एकदाजरी तोंड उघडले असतेतर २-५ हजार मतांचा फटका सहज बसला असता!_

पण एरवी कोणी ‘अरे’ म्हटलेतरी त्याची ‘उधडून’ लावणारे संजय गायकवाड मात्र प्रचार काळात चतुराईने चुप बसले, तोंड न उघडल्याने संजूभाऊंची आतल्या आत किती घुसमट होत असेल ? याची कल्पनाच न केलेली बरी. पण म्हणतात ना, मौनानं जंग जिंकता येतं..तसं मौन ठेवून यावेळी संजूभाऊ निवडणूक जिंकले. नाहीतर हातानं कमावलेलं तोंडानं गमावयाला वेळ नसता लागला. भाईजी त्यांना नेहमी मौन बाळगण्याचा सल्ला देत, एकदा एका लॉन्सवरच्या प्रचार सभेतही त्यांनी त्याचा उच्चार केला. बच गये भाऊ, बोलते तो उलटा हो जाता!

_पराभवानंतर आत्मपरिक्षणाची गरज असते, पण बुलढाण्यात विजयानंतर संजूभाऊंना गरज आहे ती खऱ्या आत्मपरिक्षणाची. खुप काही चांगले कामे केलीत म्हणून तुम्ही कुठेच चुकला नाहीत, असा अर्थ होत नाही. एकट्याच्या बळावर निवडणूक हॅडल करण्याचा तुमचा प्रयत्न, कुठेतरी अंगलट येतो की काय? असे वाटले होते शेवटी. एकाही मोठ्या नेत्याची सभा न होणं, एवढचं काय २ सभा सोडल्यातर केंद्रीयमंत्री प्रतापरावांचीही दिसणारी अनुपस्थिती..थोडा प्रचारादरम्यान ओव्हर कॉन्फीडन्स. तर दुसरीकडे विरोधात आघाडीच्या नेत्यांची अभूतपूर्व एकजूट होती, संजय गायकवाडांना पाडायचेच.. हा चंगच त्यांनी बांधला होता._

केंद्रीकरण कल्पकतेत हवं, कामात विकेंद्रीकरण हवे.

विकासामुळे मुस्लीमबहूल वस्तीत मतांची अपेक्षा सपशेल फोल ठरली, वेळही वाया गेला अन् काही ठिकाणी दिला असेलतर पैसाही. भाऊ त्यांना का कुरळवातात? हे इकडच्या अनेक कट्टरवाद्यांना टोचणारे होते. पण बोलणांर कोण? मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ?? प्रचाराचे सुक्ष्म नियोजन होते, रॅल्यांनाही प्रतिसाद होता..पण होतं काय? भाऊनंतर ताई, मग भैय्या, मग गोलू.. फ्लेक्सप्रमाणे प्रचारातही होतं. कोणी बोलून दाखवत नसलंतरी लोकांना हे दिसतं. भावी नेतृत्व म्हणून भैय्यापुरते ते ठिक आहे, त्यात तो स्पार्कही आहे.. पण एकचवेळी सर्वांचे प्रोजेक्शन संजूभाऊंनी कुठेतरी थांबवायला हवे. काय होतं, लोक कामांपेक्षा वैयक्तीक गोष्टी खुप बारकाईने न्याहाळत असतात. त्यात अनेक ठिकाणी चहापेक्षा कॅटल्या गरम होत्या, हा भाग वेगळा !

_दरम्यान झालं असंही होतं, सामाजिक पातळीवर संजूभाऊंच्या विकासकामांचे जे ढोल आधी बडवल्या जायचे..ते जयश्रीताईंना तिकीट मिळताच बऱ्याचअंशी पलटले. नात्यांचे राजकारण गोत्यात आणणारे ठरले. नाही म्हणायला हलकं-भारी मापल्या गेलं, पण “विकास हीच माझी जात..” ही लाईन संजय गायकवाड यांनी घेतल्याने अन्य घटक मोठ्या प्रमाणात त्यांच्या पारड्यात पडले. नाही म्हणायला होतं काय, हलक्या-भारीच्या तुलनेत हलकं तरून जातं. खूप काही गोष्टी आहे संजूभाऊ, आता अगदी ठेकेदारांचेही विकेंद्रीकरण व्हायला हवं.. दुसऱ्यांचंम्हणनही ऐकून घ्यायला हवं._

कामं करुनही लोक मतं देत नाही, हे आधी मनातून काढून टाका. केलेल्या कामांमुळेच एवढी विक्रमी मते तुम्हाला मिळाली. तुम्ही लोकांसाठी धावून जाता म्हणून लोकंही तुमच्यासाठी धावलेत. लाडक्या बहिणी कामी आल्या, कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले.. म्हणूनच हा विजय तुम्ही समर्पीत केला तो, झटलेल्या कार्यकर्त्यांनाच!

_जिंकलात, हा विजय एैतिहासिकच आहे. अगदी एकट्याच्या बळावर खेचून आणलेलाही. म्हणूनच संगम चौकात पोस्टर झळकलं-वन मॅन आर्मी..आता मात्र या विजयानंतर अपेक्षा आहे ती खऱ्याअर्थाने, आत्मपरिक्षणाची!_

सुलेखन: श्री राजेंद्र काळे…

Related Articles

ताज्या बातम्या