11.8 C
New York
Friday, December 19, 2025

Buy now

spot_img
spot_img

चिखलीत शिवस्मारकाच्या पायाभरणीचा ऐतिहासिक सोहळा आ. श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न..

चिखलीत शिवस्मारकाच्या पायाभरणीचा ऐतिहासिक सोहळा

आ. श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते उद्घाटन..

चिखली (प्रतिनिधी): चिखली शहरातील शिवभक्तांसाठी आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहावा असा ठरला आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा येथे उभारण्यात येणार असून, त्याच्या पायाभरणी समारंभाचा सोहळा आज मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला. या समारंभाचे उद्घाटन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ. श्वेता ताई महाले पाटील यांच्या शुभहस्ते झाले.

या भव्य कार्याचे आयोजन शिवस्मारक समितीने केले होते. शहरभरातून नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत घोषणाबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि जयजयकारांनी वातावरण दुमदुमवून टाकले.

आमदार श्वेता ताईंचे मनोगत

या प्रसंगी बोलताना आमदार सौ. श्वेता ताई महाले पाटील म्हणाल्या –

“छत्रपती शिवाजी महाराज हे रणांगणात सदैव विजयी ठरलेले, प्रजेसाठी झटणारे राजा होते. त्यांचे स्मारक म्हणजे केवळ दगड-मातीचा पुतळा नसून आपणा सर्वांच्या श्रद्धा, अभिमान आणि प्रेरणेचे केंद्र आहे. काही लोकांनी या पुतळ्याबाबत राजकीय हेतू मनात ठेवून दुश्प्रचार करण्याचा प्रयत्न केला, पण चिखलीकर जनता त्याला बळी पडली नाही. उलट आपल्या शिवप्रेमातून त्यांनी या भव्य शिवस्मारकाला पाठिंबा दिला आहे. आज या पुतळ्याची पायाभरणी करताना मला अभिमान वाटतो की हा पुतळा केवळ चिखली शहराचे भूषण ठरणार नाही, तर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर त्याच्या सौंदर्याविषयी, बांधकामाविषयी आणि चिखलीकरांच्या शिवभक्तीविषयी चर्चा होणार आहे.”

तसेच त्यांनी पुढे सांगितले की,

“हा ऐतिहासिक क्षण पुढील पिढ्यांना शिवरायांच्या धैर्य, शिस्त, पराक्रम व प्रजाप्रेमाची सतत आठवण करून देणारा आहे. स्वराज्याच्या भूमीत उभे राहणारे हे स्मारक आपल्याला नेहमी शिवरायांच्या शिकवणीशी प्रामाणिक राहण्याची प्रेरणा देत राहील.”

पुतळ्याचे वैशिष्ट्य

छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा भव्य स्वरूपात उभारला जाणार आहे. जमिनीपासून 12 फूट उंचीवर खास चबुताऱ्यावर हा पुतळा बसवण्यात येईल. पुतळ्याची उंची व लांबी तब्बल 15 फूट असेल. ब्राँझ धातूपासून निर्मित हा पुतळा केवळ भव्यतेनेच नव्हे, तर सौंदर्यानेही शहराच्या आकर्षणात भर घालणार आहे. शिवप्रेमाचे प्रतीक ठरणारे हे स्मारक चिखलीच्या सांस्कृतिक वैभवाला नवे रूप देईल.

या सोहळ्यात शिवस्मारक समितीचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात –

अध्यक्ष मा. सौ. श्वेता ताई महाले पाटील, उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंग राजपूत, सचिव सतीश गुप्त, सहसचिव अनिस भाई, कोषाध्यक्ष डॉ. निलेश गावडे, सदस्य रमेश बाहेती, वसंतराव गाडेकर, सौ. सुनीता ताई शिनगारे, सुधीर चेके पाटील, सुरेंद्र पांडे, डॉ. श्रीकृष्ण खंडागळे, महेश महाजन, सचिन बोन्द्रे, पंडितदादा देशमुख, भगवान नागवानी, विलास चव्हाण आणि रामदास गाडेकर यांचा समावेश होता.

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यामुळे चिखलीकरांच्या शिवभक्तीला नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या